
अमरावती, 26 सप्टेंबर, (हिं.स.)
जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राज्य सरकारच्या दुष्काळी घोषणेसंदर्भातील शासन निर्णयाची संतप्त शेतकऱ्यांनी होळी करून निषेध व्यक्त केला. बसस्थानकासमोर झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी वाळलेल्या सोयाबीनच्या पिकासह शासन निर्णयाची प्रत जाळत सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यंदा पावसातील मोठ्या खंडामुळे सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी उपाययोजना शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत अपुऱ्या असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.सरसकट सर्व पीक उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पिकांचे प्रत्यक्ष नुकसान, उत्पादनातील घट आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक भार याचा विचार करून तातडीने ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.7यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत दुष्काळी घोषणेच्या शासन निर्णयाचा तीव्र निषेध केला. सध्याची मदत अपुरी असून केवळ कागदी घोषणा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.दुष्काळी सवलतीचा शासन निर्णय म्हणजे ‘मेलेल्या शेतकऱ्याला व्हेंटिलेशन लावण्याचा प्रकार’ असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी