
कोल्हापूर, 26 सप्टेंबर (हिं.स.)। दरवर्षी कोल्हापूर शहरात तब्बल 24 तासाहून अधिक काळ चालणारी गणेश विसर्जन मिरवणूक यावर्षी अवघ्या 18 तासात संपली. डॉल्बी, लेसर लाईट सिस्टीमवर बंदी, कडक पोलिस बंदोबस्त, जिल्ह्यासह बाहेरून मागवलेला पोलीस फौजफाटा, विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची अद्यावत मशिनरी सह सुसज्ज यंत्रणा, आवश्यक मनुष्यबळ आणि पारंपारिक वाद्य, सजावट, कलेचा तरुण मंडळांनी केलेला योग्य वापर ही यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची वैशिष्ट्ये ठरली. किरकोळ प्रकार वगळता मिरवणूक शांततेत पार पडली. आणि मिरवणूक मार्गावर तब्बल 2 डंपर चप्पल आणि 6 टन निर्माल्य पालिकेसह सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी गोळा करून शहरात स्वच्छता मोहीम राबवली.
कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरू झाली होती. यावर्षी डॉल्बी सिस्टीमच्या आवाजाच्या मर्यादा आणि लेसर लाईट इफेक्टवर बंदी यामुळे बहुतेक मंडळांनी पारंपारिक वाद्य आणि गणेश मूर्तीला आकर्षक सजावट, विविध तांत्रिक आणि सजीव देखावे यावर भर दिला होता. शहरातील बहुतेक सर्व मंडळांच्या गणेश मूर्ती दिवसभर मिरवणुकीत दाखल झाल्या होत्या. जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक उप अधिक्षक यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेसह बाहेरून विशेष कृती दलाच्या तुकड्या पाचारण केल्या होत्या. तसेच मिरवणुकीतील मंडळांनी एक जागी 20 मिनिटांच्यावर थांबू नये असे आदेश दिले होते. त्यामुळे मिरवणुकीला पोलीस यंत्रणेकडूनच कडूनच गती देण्यात येत होती. रंकाळा तलावाजवळील इराणी खणीत सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी इराणी ख्रण येथे जेसीबी, क्रेन, चेनलिफ्ट, तराफे, अग्निशामक दल, सुरक्षा यंत्रणा आणि जवान तैनात करून सर्व गणेशमूर्तींचे सुरक्षित विसर्जन करण्याची तजवीज केली होती.
मिरवणूक मार्गावर सायंकाळी 7 नंतर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. संपूर्ण जिल्ह्यातून मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे महाद्वार रोड, गंगावेश, रंकाळवेस हा परिसर गर्दीने फुलून गेला होता. गर्दी नियंत्रणात आणताना पोलिस यंत्रणेची दमछाक झाली. काही ठिकाणी सौम्य लाठीमार करावा लागला.
मध्यरात्री 12 वाजताच सर्व ध्वनिक्षेपणे बंद करून साऊंड सिस्टिम बंद करताच नागरिकांनी घरी परत जाण्यास सुरुवात केली. अवघ्या एक तासात मिरवणूक मार्ग मोकळा झाला. मिरवणुकीतील गणेश मूर्ती साऊंड सिस्टिम शिवाय इराणी खणीत आणून विसर्जित करण्यात आल्या. त्यामुळे पहाटेच मिरवणुकीची सांगता झाली. सकाळी महापालिकेच्या सफाई विभागामार्फत मिरवणूक मार्गाची सफाई मोहीम हाती घेण्यात आली. मिरवणूक मार्गावर चपलांचे ढीग, निर्माल्य, खाद्यपदार्थ आणि डेकोरेशनच्या कागदाचे तुकडे असा 6 टन कचरा आणि दोन डंपर चपलाचे ढीग गोळा करून मिरवणूक मार्ग स्वच्छ करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar