अहमदपूर तहसील कार्यालयासमोर ठाकरे गटाकडून शासनाच्या जीआरची होळी
लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। खरीप हंगामातील पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी उपाययोजनांवर तीव्र आक्षेप घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अहमदपूर तहसील कार्यालयासमोर शासनाच्या
आंदोलन


लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

खरीप हंगामातील पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी उपाययोजनांवर तीव्र आक्षेप घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अहमदपूर तहसील कार्यालयासमोर शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ठोस आणि तातडीची मदत देण्याऐवजी कागदी घोषणा व प्रक्रियांचा आधार घेतला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने २६५ तालुक्यांमध्ये Trigger-1 अंतर्गत दुष्काळ जाहीर करून विविध १२ उपाययोजना व सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, या घोषणांमुळे प्रत्यक्ष संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातात किती मदत पोहोचणार, हा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाने शासनाच्या भूमिकेवर निशाणा साधला.

पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादासजी दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

‘वाळून गेलेले पीक दाखवायचे तरी कुठे?’

शेतकऱ्यांनी पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी वाळून गेलेली पिके काढून टाकली आहेत. अशा परिस्थितीत पंचनामे, पीक पाहणी आणि जीपीएस छायाचित्रांच्या प्रक्रियेचा आधार घेत नुकसान निश्चित करण्याची पद्धत प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरू शकते, असा आक्षेप आंदोलकांनी घेतला.

शासनाच्या पीक पाहणी व्यवस्थेत पिकांचे फोटो आणि GPS लोकेशनसह नोंदणीची तरतूद आहे. त्यामुळे पीक शेतात उरलेले नसताना नुकसान कसे नोंदवायचे, हा व्यवहार्य प्रश्न प्रशासनाने सोडवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी एक लाखाची मागणी

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी शासनावर टीका करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कोणत्याही अटीशिवाय प्रति हेक्टर एक लाख रुपयांची मदत द्यावी, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, अभियांत्रिकी व वैद्यकीय विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन व वसतिगृह फी माफ करावी, अशी मागणी केली.

तसेच दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी चारा, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, पीक विम्याची प्रभावी अंमलबजावणी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली.

“नुसत्या घोषणा करून शेतकऱ्यांची थट्टा करू नका. संकटग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत द्या,” अशी भूमिका रेड्डी यांनी मांडली. सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांवर त्यांनी यावेळी तीव्र शब्दांत टीका केली.

तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी; जीआरची होळी

शासनाच्या दुष्काळी जीआरचा निषेध करत शिवसैनिकांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. त्यानंतर शासनाने काढलेल्या Trigger-1 जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, तालुकाप्रमुख दत्ता हेंगणे, माजी तालुकाप्रमुख विलास पवार हांगरगेकर, तालुका संघटक तथा एस.टी. कामगार सेना प्रमुख अनिकेत फुलारी, उपतालुकाप्रमुख गणेश माने यांच्यासह शिवसैनिक व संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळ जाहीर झाला, सवलती जाहीर झाल्या; आता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात आणि हातात कधी पोहोचणार, हा प्रश्न या आंदोलनामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande