
लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचा दसरा उत्सव उत्साहात साजरा करण्याऐवजी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव तथा अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज बाबासाहेब पाटील यांनी यंदाच्या दसरा महोत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी नागरिकांच्या सहभागातून दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांवर होणारा खर्च यंदा टाळून तो निधी दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीस १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्सवापेक्षा मदतीला प्राधान्य देत सुरज पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे.
“यंदा दसरा उत्सवाचा नाही, तर माणुसकीचा... दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा!” असा संदेश देत त्यांनी समाजातील इतर घटकांनीही संकटाच्या काळात दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
उत्सवाच्या खर्चाला फाटा देऊन तोच निधी गरजूंसाठी देण्याच्या या निर्णयातून ‘संकटाच्या काळात उत्सवापेक्षा माणुसकी मोठी’ हा संदेश अधोरेखित झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis