आदिवासी विद्यार्थ्यांचा राजभवनाकडे एल्गार
नाशिक, 28 सप्टेंबर (हिं.स.)। : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि सकल आदिवासी समाजाच्या वतीने नाशिक ते मुंबई राजभवन ट्रायबल जेन झी उलगुलान’ ल
Tribal students march towards


नाशिक, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

: आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि सकल आदिवासी समाजाच्या वतीने नाशिक ते मुंबई राजभवन ट्रायबल जेन झी उलगुलान’ लाँग मार्चला सोमवारी सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता गोल्फ क्लब मैदान येथून सुरू झालेल्या या लाँग मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी व समाजबांधव सहभागी झाले. ‘चलो मुंबई, चलो राजभवन’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

१८ ऑगस्ट, २० ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी आंदोलन करूनही मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्याने हा लाँग मार्च काढण्यात आला. निकृष्ट भोजन देणारे सेंट्रल किचन बंद करावे, आश्रमशाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.गडचिरोलीतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपये, तर जखमी विद्यार्थिनींना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वयंसहाय्य योजनेतील प्रलंबित थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) तातडीने वितरित करून विद्यार्थ्यांना वाढीव आर्थिक सहाय्य द्यावे, अशीही मागणी आहे.आयुक्त व सचिव यांच्या बदल्यासह आदिवासी विकास विभागातील प्रशासकीय प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, तसेच आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे .दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये समोर आलेली नावे सोनू गायकवाड, जयश ठाकरे, विवेक गावित, विकी मुंजे आणि जीवन भोये यांचा समावेश असल्याचे समजते.

विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत. काही विद्यार्थ्यांना अटक झाली तरी न्यायाच्या मागणीसाठी सुरू झालेला आमचा मोर्चा थांबणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून आमच्या मागण्या ऐकाव्यात आणि त्यावर ठोस निर्णय घ्यावा. आम्ही तुमचेच विद्यार्थी आहोत. आमच्या समस्या समजून घेऊन आमचा आवाज ऐकावा आणि संवादातून मार्ग काढावा. दडपशाही नको, संवाद हवा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. न्यायाच्या मागणीसाठी सुरू झालेला मोर्चा सुरूच राहणार आहे.”

प्रशांत गावंढे, सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती, महाराष्ट्र

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande