शेतकऱ्यांना टँकरने पाणीपुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करणार : आ. संजय बनसोडे
लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। उदगीरची बाजार समिती १०० एकरांत उभारण्याचा मानस; सर्व प्रस्तावित कामे मार्गी लावणार लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार आणि विकास करण्यासाठी आपण खंबीरपणे पाठीशी उभ
संजय बनसोडे


लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

उदगीरची बाजार समिती १०० एकरांत उभारण्याचा मानस; सर्व प्रस्तावित कामे मार्गी लावणार

लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार आणि विकास करण्यासाठी आपण खंबीरपणे पाठीशी उभे राहणार असून, बाजार समितीशी संबंधित सर्व प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी दिली.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना आ. संजय बनसोडे बोलत होते. यावेळी बाजार समितीच्या विकासासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी सभापती शिवाजीराव हुडे, उपसभापती प्रिती भोसले, संचालक कल्याण पाटील, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, गटनेते दिलीप मटके, जि.प. सदस्य उमेश उमापुरे, बालाजी भोसले, वसंत पाटील, बाळासाहेब मरलापल्ले, विक्की भोसले, प्रा.श्याम डावळे, ज्ञानेश्वर पाटील दावणगावकर, प्रमोद पाटील, सोपानराव ढगे, बालाजी देवकत्ते आदी गावचे चेअरमन व सरपंच, उपसरपंच, व्यापारी, हमाल, शेतकरी उपस्थित होते.

उदगीरची बाजार समिती भविष्यात अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्याच्या दृष्टीने १०० एकर जागेत विस्तारित मार्केट कमिटी उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. बाजार समितीसाठी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यासह आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संबंधित पणन मंत्र्यांकडे प्रत्यक्ष जाऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी हा बाजार समितीच्या केंद्रस्थानी असून, शेतकऱ्यांवर कोणतेही संकट ओढवल्यास बाजार समितीच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन दुष्काळाच्या अनुषंगाने राज्य शासन शेतकऱ्यांसोबत असल्याचे आ. बनसोडे म्हणाले.

दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी गरज भासल्यास शेतकऱ्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

उदगीर मतदारसंघाच्या सहकार क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचे सहकार भवन उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले. बाजार समिती, सहकार क्षेत्र आणि शेतकरी यांच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा प्रभावीपणे उपयोग करून घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकसंघ राहणे आवश्यक आहे. विकासाच्या प्रश्नांवर राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी आणि बाजार समितीशी संबंधित सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास उदगीर बाजार समितीचा विकास अधिक वेगाने साध्य होईल, असे आवाहन आ. संजय बनसोडे यांनी केले.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा, बाजारपेठ आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्याची ग्वाही आ.संजय बनसोडे यांनी यावेळी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande