माणगाव-इंदापूर बायपासची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे शिवेंद्रराजेंचे निर्देश
रायगड, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास यंदा कोंडीविना आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेची विशेष खबरदारी घ्या, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी
No traffic jams on the Mumbai-Goa highway during Ganeshotsav!


No traffic jams on the Mumbai-Goa highway during Ganeshotsav!


रायगड, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास यंदा कोंडीविना आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेची विशेष खबरदारी घ्या, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासह माणगाव व इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य द्यावे. उत्सवाच्या दहा दिवसांत महामार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि युद्धपातळीवर काम करावे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नागोठणे उड्डाणपुलावर विशेष लक्ष नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत राहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचे नियमित निरीक्षण करावे. वाहनांच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना कराव्यात. गणेशोत्सव काळात उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबाबत दररोज पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश भोसले यांनी दिले.

बायपासची कामे वेळेत पूर्ण करण्याचा आदेश पनवेल-इंदापूर आणि इंदापूर-झाराप मार्गावरील कामांचा आढावा घेताना माणगाव आणि इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता यामध्ये कोणतीही तडजोड करू नये. महामार्गाच्या कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी बजावले.

प्रवाशांसाठी सुविधा केंद्रे; पर्यायी मार्गही सज्ज महामार्गावरील गर्दी लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. येथे पाणी, वीज, स्वच्छता, वैद्यकीय मदत आणि चलत स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतुकीचा भार वाढल्यास पर्यायी मार्गांचा वापर करता यावा, यासाठी अंतर्गत रस्तेही सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, गणेशोत्सव काळातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी टोलमाफीच्या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच प्रवाशांच्या सुविधांवर प्रशासनाचा कस लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande