
तंत्रज्ञान, प्रश्नपत्रिका सुरक्षा आणि मूल्यांकनातील पारदर्शकतेवर चर्चा
नागपूर, 03 सप्टेंबर (हिं.स.) : परीक्षा पद्धतीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यासोबतच परीक्षांमध्ये पारदर्शकता, शैक्षणिक प्रामाणिकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत विविध शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.
परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींवर प्रभावी उपाययोजना आणि विद्यार्थीकेंद्रित सुधारणा यावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह आयआयएम नागपूर, एम्स नागपूर, व्हीएनआयटी नागपूर, व्ही.एम.व्ही. महाविद्यालय आणि श्रीनिकेतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्हीएनआयटी नागपूर येथे ‘परीक्षा पद्धतीतील सुधारणा’ या विषयावर गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेत झालेल्या खुल्या चर्चासत्रात एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर, रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू विनायक देशपांडे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, एम्स नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे आणि व्हीएनआयटीचे डीन डॉ. यशवंत वाटपात्र यांनी परीक्षा व्यवस्थेसमोरील विविध आव्हानांवर आपली मते मांडली.
यावेळी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, परीक्षा सुरक्षाव्यवस्था, संस्थात्मक उत्तरदायित्व आणि विद्यार्थीकेंद्रित सुधारणा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. ‘परीक्षा : समस्या व समाधान’ या विषयावर माजी यूजीसी सचिव डॉ. मनीष जोशी यांनी मार्गदर्शन केले.
प्रश्नपत्रिका सुरक्षेसाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारणे, मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता वाढविणे, तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी करणे तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांची जबाबदारी निश्चित व अधिक सक्षम करण्याबाबत विविध सूचना यावेळी मांडण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून परीक्षा प्रक्रियेला अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनविण्याच्या गरजेवरही वक्त्यांनी भर दिला.
परिषदेच्या प्रारंभी डॉ. अभय मुदगल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. संदीप लांजेवार यांनी प्रास्ताविकातून परीक्षा पद्धतीतील सुधारणांची आवश्यकता स्पष्ट केली. त्यानंतर ॲड. रविशंकर मोर यांनी ‘परीक्षा : सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावर विचार मांडले.परिषदेचा समारोप अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री देवदत्तजी जोशी यांच्या मार्गदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अभाविप विदर्भ प्रांत मंत्री देवाशीष गोतरकर यांनी केले.या गोलमेज परिषदेला शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी