
बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी दि. २९ ऑगस्टपासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे दुकानदार व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात लिंबागणेशकरांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “एक मराठा, लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचे” मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत निदर्शने करून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजात तीव्र असंतोष : डॉ. गणेश ढवळे
गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोजदादा जरांगे पाटील प्राणांतिक उपोषणे व विविध आंदोलने करत आहेत. आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर सरकारच्या प्रतिनिधींकडून आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या बाबतीत ठोस निर्णय होत नसल्याने मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
सरकारने केवळ आश्वासनांची खैरात न करता मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस व सकारात्मक निर्णय घ्यावा. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मनोजदादा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे, अशी मागणी मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर यांनी केली.
यावेळी स्थानिक दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक, नागरिक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis