
ठाणे , 03 सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) व शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने ‘गोकुळ दहीहंडी २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हा दहीहंडी उत्सव पार पडणार असून, स्व. मीनाताई ठाकरे चौक, कॅसल मिल नाका, ठाणे (प.) येथे गोविंदा पथकांच्या थराराचा अनुभव ठाणेकरांना घेता येणार आहे, अशी माहिती आयोजक ठाण्याचे उपमहपौर कृष्णा पाटील यांनी दिली आहे.
यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे गोविंदा पथकांसाठी तब्बल ५५ लाख रुपयांची बक्षिसे व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत. पुरुष गोविंदा पथकांसाठी १० थर रचणाऱ्या पथकास ११ लाख ११ हजार १११ रुपये, तर त्यानंतर प्रत्येक १० थर रचणाऱ्या पथकास ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच ९ थरांसाठी ५ लाख ५५ हजार ५५५ रुपये, त्यानंतर प्रत्येक ९ थरांसाठी २ लाख २२ हजार २२२ रुपये, तर ८ थरांसाठी ५१ हजार रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
याशिवाय ७ थरांसाठी १५ हजार, ६ थरांसाठी ९ हजार, ५ थरांसाठी ५ हजार आणि ४ थरांसाठी ४ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.
महिला गोविंदा पथकांसाठीही विशेष बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम ७ थर रचणाऱ्या पथकास १ लाख ११ हजार रुपये, त्यानंतर प्रत्येक ७ थरांसाठी ५१ हजार रुपये, ६ थरांसाठी २५ हजार रुपये, ५ थरांसाठी १० हजार रुपये आणि ४ थरांसाठी ५ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच पारंपरिक दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि सामाजिक संदेश जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. उत्सवस्थळी `नशा मुक्त युवा, नशामुक्त भारत' हा संदेश देण्यासाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदा पाटील, आणि सचिन पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘गोकुळ दहीहंडी २०२६’चा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर