
लातूर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : लातूर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत शहरातील विविध विकासकामे तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून कृती आराखड्यानुसार कामांना गती द्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार बसवराज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.
बैठकीत विभागनिहाय विकासकामांचा आढावा घेताना मंजूर निधी, कामाची आदेश तारीख, काम पूर्ण करण्याची मुदत तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्याचे नाव याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी ३० दिवस, ९० दिवस आणि सहा महिन्यांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले.
शहरातील पाणीपुरवठा आणि पाणीटंचाईच्या प्रश्नावर बैठकीत विशेष चर्चा झाली. पाणी वितरणातील अंतर कमी करणे, पाईपलाईन गळती रोखणे आणि कमी दाबाने पाणी मिळणाऱ्या भागातील समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या. आगामी उन्हाळा तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.
उघड्या नाल्यांना संरक्षक व्यवस्था करण्याचे निर्देश
खोरी गल्ली येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील उघड्या नाल्यांना तातडीने संरक्षक व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः शाळा आणि दाट लोकवस्तीच्या परिसरातील धोकादायक ठिकाणांना प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले. पावसाळी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शहराचा दीर्घकालीन निचरा आराखडा तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
खड्डेमय रस्ते, कामांच्या गुणवत्तेवर भर
शहरातील खड्डेमय रस्त्यांची प्रभागनिहाय दुरुस्ती करण्यासोबतच रस्ते कामांचे गुणवत्ता परीक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विविध विकासकामांसाठी रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर ते पूर्ववत करण्याची कार्यवाहीही तत्काळ करण्यावर भर देण्यात आला.याशिवाय घरोघरी कचरा संकलन प्रभावीपणे राबविणे, कचरा संकलन वाहनांचे जीपीएसद्वारे निरीक्षण करणे, बंद पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करणे, शाळांच्या परिसरातील उघडे विद्युत वितरण पेटारे सुरक्षित करणे तसेच धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यावरही चर्चा
महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वस्तू व सेवा कर परतावा तसेच प्रलंबित अनुदानाचा प्रश्न राज्यस्तरावर मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आमदार बसवराज पाटील यांनी सांगितले. लातूर शहरातील प्रलंबित विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी तसेच आवश्यक अतिरिक्त निधी उपलब्ध करून घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, विरोधी पक्षनेते देविदास काळे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, उपायुक्त वसुधा फड, उपायुक्त पंजाबराव खानसोळे, नगरसेवक गिरीश पाटील, प्रविण कस्तुरे, ॲड. मोरे, गणेश गवारे, नगरसेविका रागिणी यादव, करुणा शिंदे, राजश्री बाहेती, शोभा पाटील, सत्यवती चेवले, नगरसेवक ऋषिकेश राजे, नगरसेविका संगिता मिरचे, भीमाशंकर बेंबळकर, रविशंकर जाधव, अनंत गायकवाड, शीतल पाटील, उद्धव तेलंगे तसेच मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगणे, शहर अभियंता उषा काकडे यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis