
लातूर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हे तपास प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि सक्षम करण्याच्या दिशेने लातूर जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून (एनसीआरबी) प्राप्त माहितीनुसार, ई-साक्ष्य आयडी तयार करून संबंधित गुन्हे व प्रकरणांशी जोडण्याच्या कामात लातूर जिल्ह्याने ९९.९८ टक्के कामगिरी नोंदवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लातूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे डिजिटल पोलिसिंगच्या क्षेत्रातील जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. लातूरनंतर सिक्कीम राज्यातील एका जिल्ह्याने द्वितीय, तर हरयाणा राज्यातील रेवारी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान उपलब्ध होणारे फोटो, व्हिडिओ आणि अन्य डिजिटल पुरावे अधिकृत पद्धतीने नोंदवणे, त्यांना स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक देणे आणि संबंधित गुन्हा किंवा एफआयआरशी जोडणे ही तपास प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
ई-साक्ष्य प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल पुराव्यांचे सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने संकलन व व्यवस्थापन करता येते. संबंधित पुराव्याला स्वतंत्र ई-साक्ष्य आयडी (SID) देऊन तो संबंधित गुन्हा किंवा एफआयआरशी जोडला जातो. त्यामुळे तपासादरम्यान पुराव्यांची नोंद, उपलब्धता आणि पारदर्शकता अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत होते.
अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी
लातूर जिल्ह्याने मिळविलेली ही राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली साध्य झाली. ई-साक्ष्य आयडी निर्मिती आणि लिंकिंगच्या कामाला प्राधान्य देत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व अंमलदारांकडून हे काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करून घेण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी संपूर्ण प्रक्रियेचे सातत्याने बारकाईने निरीक्षण केले. कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेत संबंधित अधिकारी आणि अंमलदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रभावी नियोजन आणि अधिकारी-अंमलदारांमधील समन्वयामुळे ही राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी साध्य झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
जवळपास शंभर टक्के कामगिरी
ई-साक्ष्य प्रणालीचा प्रभावी वापर हा केवळ तांत्रिक बाब नसून गुन्हे तपासातील डिजिटल पुराव्यांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. न्यायालयीन प्रक्रियेत डिजिटल पुराव्यांची योग्य नोंद, सुरक्षित व्यवस्थापन आणि उपलब्धता महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी नोंदवलेली ९९.९८ टक्के कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
या राष्ट्रीय कामगिरीबद्दल लातूर जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उत्कृष्ट सांघिक कार्याच्या माध्यमातून डिजिटल पोलिसिंगमध्ये लातूरचा लौकिक कायम ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis