
मुंबई, 05 सप्टेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्रातील समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि लोककलावंतांच्या कलाप्रवासाचे प्रकाशचित्रांच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करणाऱ्या डॉ. नितीन सोनवणे लिखित ‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या करिष्मा सभागृह, ५ वा मजला येथे हा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी डॉ. नितीन सोनवणे लिखित ‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असून, त्यानंतर शेखर निरंजन भाकरे आणि सहकलाकार यांच्याकडून विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये लोककला आणि लोकपरंपरांचे जतन व संवर्धन करणाऱ्या लोककलावंतांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कलासाधनेची, जीवनप्रवासाची आणि सांस्कृतिक योगदानाची प्रकाशचित्रांच्या माध्यमातून नोंद घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. लोककलावंतांच्या कार्याचे स्मरण करण्यासोबतच महाराष्ट्राच्या लोककलेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण, जतन, संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. कला, साहित्य, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर