
मांजरा धरणातील जॅकवेलची आयुक्तांनी केली पाहणी
लातूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। शहराच्या वाढीव पाणी पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या अमृत २.० योजनेच्या कामाला गती देण्याच्या सूचना मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी दिल्या. त्यांनी मांजरा धरणातील प्रस्तावित जॅकवेलच्या कामाची पाहणी केली. केंद्र शासनाच्या अमृत २.० अंतर्गत २५९ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेत मांजरा धरणात नवीन जॅकवेल आणि तेथून हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १२०० मिमी व्यासाची सुमारे ५० किमी जलवाहिनी टाकण्यात येत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात पाण्याची आवक मर्यादित असली, तरी सुमारे ७० फूट खोलीतील जॅकवेलचे काम सुरू ठेवता आले आहे. जॅकवेलचे काम यावर्षी पूर्ण करून भविष्यातील पाणीटंचाईच्या काळात त्याचा उपयोग करता येईल का, याचीही शक्यता तपासण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. कामाला वेग देतानाच गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून शहराला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, कार्यकारी अभियंता शिवसागर मंठाळे, प्रकल्प व्यवस्थापक विजय चोळखणे, तांत्रिक सल्लागार इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis