
छत्रपती संभाजीनगर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देत भाजपा नेते, माजी मंत्री तथा आमदार बबनरावज लोणीकर यांनी जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन गंभीर आजाराने उपचार घेत असलेल्या ३० वर्षीय अंकुश हरिभाऊ कचरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. दोन्ही किडन्या निकामी झालेल्या अंकुश यांच्या प्रकृतीची त्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून उपचाराची संपूर्ण माहिती जाणून घेतली. पुढील उपचारांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
रुग्णाला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा वेळेत मिळाव्यात, उपचारात कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि पुढील उपचारासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, यावर त्यांनी भर दिला. भाटेपुरी तालुका जिल्हा जालना येथील रहिवासी असलेल्या अंकुश कचरे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंकुश कचरे यांच्या आईने किडनी दान करण्याची तयारी दर्शविली असून तपासण्यांनंतर आईची किडनी जुळल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यामुळे अंकुश यांच्या उपचारासाठी प्रत्यारोपणाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. रुग्णाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उपचारासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी कुटुंबीयांना सांगितले. मुख्यमंत्री सहायता निधीसह उपलब्ध असलेल्या शासकीय मदतीच्या माध्यमातून उपचारासाठी सहकार्य मिळावे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis