
नाशिक, 08 सप्टेंबर (हिं.स.)। चार वर्षानंतर प्रथमच प्रशासकीय राजवटीनंतर नाशिक महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता परतल्याने यंदाच्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव नियोजनाची बैठक होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर (दि.९) दुपारी मनपाच्या वतीने राजीव गांधी भवन येथे दुपारी ३.३० वाजता विशेष नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महापौर आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत गणेश मंडळांच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. नाशिक मनपाच्या प्रशासकीय राजवटीत आलेल्या छोट्या - मोठ्या अडचणी थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मंडळांना मिळणार आहे.
दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून शहरातील असंख्य गणेश मंडळांनी आपल्या परिसरातील आणि अडचणी रस्ता विद्युत यासंदर्भात मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांन निवेदन देऊन तातडीने यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे, मात्र हे काम संथगतीने सुरू असल्यामुळे गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे.
शहरातील खड्डे, मिरवणूक मार्गांची दुरवस्था, महावितरणच्या तात्पुरत्या वीज जोडणीच्या अटी, तसेच मिरवणुकीच्या वेळेचा मुद्दा प्रमुख ठरण्याची शक्यता आहे. ध्वनिक्षेपक, डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांबाबत पोलीस-प्रशासनाची भूमिका, तसेच विविध परवानग्यांच्या प्रक्रियेतील अडचणींबाबतही मंडळांचे पदाधिकारी आपली स्पष्ट भूमिका मांडणार आहे. अवघ्या सहा दिवसांनी गणेशोत्सव सुरू होत असून, त्याच्या नियोजनासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळांचे प्रमुख, पदाधिकारी, नगरसेवक आणि विविध पक्षांचे गटनेते यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन मनपाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI