
परभणी, 08 सप्टेंबर (हिं.स.)। गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणार्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 07659/07660 नांदेड-सावंतवाडी रोड-नांदेड विशेष रेल्वेच्या दोन फेर्या होणार असून, या सेवेमुळे मराठवाड्यातील प्रवाशांना पुणे, कल्याण, पनवेलमार्गे कोकणातील विविध भागांत थेट रेल्वेने जाता येणार आहे. इतिहासात प्रथमच मराठवाड्यातून कोकणासाठी नांदेड-रत्नागिरी/सावंतवाडी दरम्यान विशेष रेल्वे धावणार असल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक 07659 नांदेड-सावंतवाडी रोड विशेष रेल्वे हुजूर साहिब नांदेड येथून 12 आणि 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8 वाजता सुटणार आहे. ही गाडी मार्गातील विविध स्थानकांवर थांबे घेत सावंतवाडी रोड येथे तिसर्या दिवशी पहाटे 3.30 वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 07660 सावंतवाडी रोड-हुजूर साहिब नांदेड विशेष रेल्वे 14 आणि 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटणार असून, ती दुसर्या दिवशी सकाळी 11.30 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचणार आहे. दरम्यान, गणपती उत्सवासाठी कोकणातील गावी जाणार्या नागरिकांनी या विशेष रेल्वेसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीचे अद्ययावत वेळापत्रक, आरक्षणाची उपलब्धता तसेच संबंधित स्थानकांवरील थांब्यांची माहिती तपासावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis