
सोलापूर, 08 सप्टेंबर (हिं.स.)। मुंबई आणि बंगळूरु या दोन प्रमुख शहरांना सोलापूरमार्गे जोडणारी वातानुकूलित नवीन वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत. मुंबई-बंगळूरु मार्गावर धावणारी ही सेमी हायस्पीड रेल्वे ऑक्टोबर २०२६पासून सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावर नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.
या प्रस्तावित रेल्वे सेवेमुळे सोलापूरसह मार्गावरील प्रवाशांना मुंबई आणि बंगळूरुदरम्यान अधिक वेगवान, आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. स्लीपर कोचची सुविधा असल्याने रात्रीच्या प्रवासासाठीही ही रेल्वे उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या गाडीच्या आरक्षण व्यवस्थेत महत्त्वाचा बदल प्रस्तावित आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये RACची सुविधा उपलब्ध नसणार असून, प्रवासासाठी पूर्णपणे कन्फर्म तिकीट आवश्यक असणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील तिकीट कन्फर्म झाल्याशिवाय प्रवाशांना या रेल्वेतून प्रवास करता येणार नाही.
मुंबई-बंगळूरुसारख्या महत्त्वाच्या मार्गावर सोलापूरला जोडणारी ही सेवा सुरू झाल्यास शहराच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारतचा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवाशांची मोठी सोय होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड