मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
* राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न - संजय राऊत * राज ठाकरेही राहणार उपस्थित मुंबई, ११ ऑक्टोबर (हिं.स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची 14 ऑक्टोबर
संजय राऊत


* राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न - संजय राऊत

* राज ठाकरेही राहणार उपस्थित

मुंबई, ११ ऑक्टोबर (हिं.स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची 14 ऑक्टोबर रोजी भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मनसे अध्यक्ष राज ठाकरे या शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत. निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे. प्रत्येकाच्या काही समस्या आहेत. भाजपच्या देखील काही समस्या आहेत. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण दिले आहे. या व्यतिरिक्त महायुतीतील दोन्ही पक्षांना आम्ही पत्र पाठवले आहे. ही बैठक 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील दिल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट देखील केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे. तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. हे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे. भेटीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande