नागपूर, ११ ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात त्यांच्या ५७व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’सह ४ जागतिक विक्रम नोंदवत राष्ट्रसंतांना आगळीवेगळी आदरांजली अर्पण करण्यात आली.
एकूण ४ जागतिक विक्रमांची नोंद
विद्यापीठाने ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे...’ या गीताचे सामूहिक गायन करून खालील चार विक्रमांची नोंद केली:
1. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड: एकाच गीताचे सर्वाधिक ऑनलाईन व्हिडिओ अल्बम – १५,४०२ विद्यार्थ्यांचा सहभाग.
2. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड – एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी विद्यापीठ गीत गाणे.
3. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड – सर्वाधिक सहभागींसह विद्यापीठ गीत गायन.
4. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया – विद्यापीठ गीतासाठी सर्वाधिक सहभाग.
विद्यापीठाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ५२,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी १६ हजारांहून अधिक जणांनी प्रत्यक्ष उपस्थिती तर इतरांनी डिजिटल माध्यमातून सहभाग घेतला.
उत्कृष्ट मार्गदर्शन आणि प्रेरणा
कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रसंतांचे विचार आजही तितकेच समर्पक असल्याचे सांगून मानवता हाच खरा धर्म आहे असा संदेश दिला.
हास्य अभिनेता श्री भारत गणेशपुरे यांनी आपल्या विनोदी शैलीत ग्रामगीतेतील ओव्यांच्या माध्यमातून जीवनमूल्यांवर प्रकाश टाकला. “काहीही करा पण मनापासून करा”, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाला मान्यवर अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,
अभिनेता भारत गणेशपुरे
, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, ॲड. आशिष जयस्वाल
, आमदार डॉ. आशिष देशमुख
, कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे
, गिनीज प्रतिनिधी इमा ब्रेन (इंग्लंड) आणि विविध विक्रम संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आणि यश
कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना आणि अंमलबजावणी ही राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली. डॉ. माधवी खोडे चवरे यांनी तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठातील विविध विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि इतर स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन विद्यापीठाने एक आगळीवेगळी आदरांजली दिली असून, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी