छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
५० खोके घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी द्यावेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी क्रांती चौकातून हंबरडा मोर्चा सभेत आज केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढला. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चाद्वारे त्यांनी अतिवृष्टीमुळे गलितगात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासह त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. यासाठी संभाजीनगरसह आसपासच्या अनेक जिल्ह्यांतील शेतकरी व ठाकरे गटाचे कार्यकर्ते संभाजीनगरात एकवटले होते.कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे
तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची मतं हवी आहेत. शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही सरकार आणता. शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही राजकारण करतात. मग शेतकऱ्यांनी न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणतात त्याचे राजकारण नाही. हे कुठलं सरकार आहे? कर्जाचे पुनर्गठन करणार असे सांगितले. आम्हाला हे पुनर्गठण नको आहे. आजचं मरण उद्यावर नको. आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आहे. मुख्यमंत्री बोललेत की, यांना अधिकार काय? परंतु मला अधिकार आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्त करून दाखवलं होतं. सरकारला आम्ही इशारा देत आहोत जर तुम्ही कर्जमुक्त केली नाही तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरवून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिला.
ज्या लोकांनी 50 खोके घेतलेत, त्या लोकांकडे आम्ही हेक्टरी 50 हजार रुपयांची मागणी करत आहोत. हे लोक असे तसे वठणीवर येणार नाहीत. यांच्या पाठीवर आसुड ओढून त्यांना वठणीवर आणावे लागणार आहे. सरकारने पॅकेज जाहीर केले. सर्वांना 31 हजार कोटींचे पॅकेज इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज वाटले. पण प्रत्यक्षात हे पॅकेज इतिहासातील सर्वात मोठी थाप आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारने एवढी मोठी थाप मारली नव्हती. पण या देवेंद्र फडणवीस सरकारने इतिहासातील सर्वात मोठी थाप मारली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्हाला हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत हवी आहे. मुख्यमंत्र्यांनी खरडून गेलेल्या जमिनीला मनरेगातून साडेतीन लाख देण्याची घोषणा केली आहे. मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी दिवाळीपूर्वी या 3 लाखांपैकी 1 लाख माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाका. मी राजकारण करत नाही. पण हे सरकार आपली व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्यांना राजकारण न करण्याचा सल्ला देऊन त्याचे तोंड गप्प करतात, असेही ते म्हणाले.
सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. मुख्यमंत्री बोललेत खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार आहोत. मग मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतोय की, तुमची नियत असेल तर दिवाळीपूर्वी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis