इस्लामाबाद, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांचा भारत दौरा सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानने संयुक्त निवेदन जाहीर केले, ज्यामध्ये जम्मू-काश्मीरला भारताचा भाग म्हणून ओळख देण्यात आली. यावर पाकिस्तानने तीव्र आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानच्या या भूमिकेवर टीका करताना म्हटलं आहे की, हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठीच्या (युएनएससी) ठरावांचा उल्लंघन आहे.
अफगाण परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली, ज्यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचे प्राण गेले होते. याबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुत्तकी यांचे आभार मानले. मात्र, हे सर्व पाहून पाकिस्तान चिडून गेला आहे. पाकिस्तानने अफगाण परराष्ट्र मंत्री मुत्तकी यांच्या भारत दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आणि जारी केलेल्या निवेदनात म्हटलं कि,“ अफगाणिस्तानच्या भूमीवर पाकिस्तानविरुद्ध दहशतवाद फोफावत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाकिस्तानवर टाकल्याने अंतरिम अफगाण सरकारला प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांतता व स्थिरतेची जबाबदारी नाकारता येणार नाही.”
दुसरीकडे, अफगाण परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांनीही अफगाणिस्तानात होणाऱ्या अनेक स्फोटांबद्दल पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं “अफगाण भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ शकत नाही. पाकिस्तानची ही वागणूक पूर्णपणे चुकीची आहे. अशा पद्धतीने समस्या सुटत नाहीत. आम्ही संवादासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत. पण पाकिस्तानला त्यांची समस्या स्वतःच सोडवावी लागेल. ४० वर्षांनंतर अफगाणिस्तान शांतता आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.”
दरम्यान, २०२१ मध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अफगाण परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांची ही पहिली भेट होती. या भेटीत मुत्तकी यांनी भारताला आश्वासन दिलं की अफगाणिस्तान दहशतवादाच्या पूर्ण विरोधात आहे, आणि कोणालाही अफगाण भूमीचा वापर दहशतवादी हेतूंसाठी करू दिला जाणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode