मुंबई, 12 ऑक्टोबर, (हिं.स.)। बॉलीवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज घेऊन येत आहे. अजय लवकरच आपल्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दे दे प्यार दे 2’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्याचसोबत रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर मोशन पोस्टर शेअर करत अजय देवगण म्हणाला,
“दे दे प्यार दे चा सिक्वेल माझ्यासाठी खूप खास आहे. आशीषला शेवटी आयशाच्या पालकांची मंजुरी मिळणार? प्रेम विरुद्ध कुटुंब – ही लढत आता आणखी मनोरंजक होणार आहे. ‘दे दे प्यार दे 2’ 14 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.”
२०१९ मध्ये आलेल्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटात अजय देवगण, रकुल प्रीत सिंह आणि तब्बू यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. आता या सिक्वेलमध्ये कथेला पुढे नेताना दुप्पट रोमँस आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘दे दे प्यार दे 2’ मध्ये अजय देवगणसोबत आर. माधवन आणि मीझान जाफरी (अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा) महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटाचं दिग्दर्शनही हलकंफुलकं, विनोदी आणि कौटुंबिक नात्यांच्या भावना सांगणारं असेल. चित्रपटाचं संगीत, संवाद आणि कथा हे तिन्ही घटक प्रेक्षकांना हसवणारे आणि भावूक करणारे ठरणार आहेत.
‘दे दे प्यार दे 2’ हा चित्रपट 14 नोव्हेंबर 2025, दिवाळी वीकेंडला प्रदर्शित होणार असून, अजय देवगणच्या चाहत्यांसाठी हा सणासुदीचा एक खास सिनेमॅटिक गिफ्ट ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर