पुणे, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवच्या माध्यमातून 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी नॅशनल फिल्म आरकाईव ऑफ इंडिया याठिकाणी दुसऱ्या ‘मान्सून एडिशन'चे उत्साहात उद्घाटन शनिवारी पार पडले. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, पीफ निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते,पीफ आंतरराष्ट्रीय चित्रपट निवड प्रमुख आदिती अक्कलकोटकर, चित्रपट समीक्षक आणि लेखिका मीना कर्णिक उपस्थित होते.
यावेळी समर नखाते म्हणाले की ‘ जागतिक स्तरावरील नामांकित असा पीफ फेस्टिवल जानेवारी महिन्यामध्ये पुण्यात पार पडतो. मात्र, त्यानंतर वर्षभरात आणखी एखादा महोत्सव असावा अशी मागणी प्रेक्षकांकडून वारंवार येत होती. त्यानुसार मागील वर्षीपासून मान्सून एडिशन नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट दाखवण्यात येत आहे. यामध्ये कान्स चित्रपट महोत्सव, बर्लिन चित्रपट महोत्सव, व्हेनिस फिल्म फेस्टिवल, कार्लोवायव्हेरी फिल्म फेस्टिवल यामधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार चित्रपट दाखवण्यात येत आहे. नागपूर आणि लातूरला अशाप्रकारे पीफ माध्यमातून चित्रपटांचे स्क्रीनिंग करण्यात आले होते मात्र, पुण्यात प्रथमच हे चित्रपट दाखवण्यात येत आहे यावर्षी फ्रान्स,चिली, स्पेन, इटली, कोस्टारिका, अर्जेंटिना आणि सिंगापूर या देशातील चित्रपटांचा समावेश महोत्सवात करण्यात आलेला आहे.
पुण्यातील प्रभात रस्ता येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ‘मान्सून एडिशन' २०२५ अंतर्गत शनिवारी दुपारी ४.०० वाजता दिग्दर्शक - फ्रान्सिस्का कोमेन्सिनी (फ्रान्स, इटली) निर्मित
‘The Time it Takes’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सायं – ६.१५ वाजता दिग्दर्शक - जीन-क्रिस्टोफ म्युराइज (फ्रान्स) यांचा चित्रपट - ‘Plastic Guns’ आणि रात्री ८.१५ वाजता दिग्दर्शक - ॲनी सोफी बेली (फ्रान्स) यांचा चित्रपट ‘My Everything’ पुणे फिल्म फाऊंडेशन माध्यमातून दाखवण्यात आला.
रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ , वेळ – दुपारी ४.०० वाजता , स्थळ – राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय प्रभात रोड, पुणे. दुपारी – ४.०० वाजता चित्रपट - ‘Delirio’ दिग्दर्शक - अॅलेक्झांड्रा लॅटिशेव्ह सालाझार (कोस्टारिका, चिली), सायं. ५.३० वाजता. चित्रपट - ‘The Wailing’ दिग्दर्शक - पेड्रो मार्टिन सॅलेरो (स्पेन, फ्रान्स, अर्जेंटिना) रात्री ७.३० वाजता. चित्रपट - ‘Mongrel ’ दिग्दर्शक - वि लियांग चियांग, यू कियाओ यिन (तैवान, सिंगापूर, फ्रान्स) हे चित्रपट दाखवण्यात येतील. अशी माहिती पिफचे उपसंचालक विशाल शिंदे यांनी सांगितली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर