नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर (हिं.स.)यशस्वी जयस्वालने वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्ली कसोटीत १७५ धावा केल्या. जरी त्याने द्विशतक झळकावता आले नसले तरी त्याने आपल्या फलंदाजीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. जयस्वालने दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात २२ चौकार मारले आणि २५८ चेंडूत १७५ धावा केल्या.
जयस्वालच्या १७५ आणि गिलच्या १२९ धावांमुळे भारताने पहिल्या डावात ५१८ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने जयस्वालच्या या खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सध्या दिल्लीत असलेल्या लाराने जयस्वालला मिठी मारली आणि त्याचे अभिनंदन केले. नंतर एक खास विनंती केली, आमच्या गोलंदाजांना इतके जोरात मारू नका. जयस्वालची त्यानंतरची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जयस्वालने लाराचे ऐकल्यानंतर म्हटले, नाही...सर, असे नाही.
फलंदाजी करताना आपल्या मानसिकतेबद्दल बोलताना, जयस्वाल म्हणाला की, तो नेहमीच शक्य तितका वेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. मी नेहमीच संघाला प्राधान्य देतो, मी माझ्या संघासाठी कसे खेळू शकतो आणि त्या क्षणी माझ्या संघासाठी काय महत्वाचे आहे. म्हणून मी नेहमीच याचा विचार करतो आणि त्यामुळे मला कसे खेळता येईल, मी कोणते शॉट्स खेळू शकतो, विकेट कशी आहे आणि जर मी मैदानावर असतो, तर मी शक्य तितका वेळ फलंदाजी करतो याची खात्री करतो. म्हणून, माझी मानसिकता अशी आहे की, जर मला सुरुवात मिळाली तर मी त्या खेळीचे रुपांतर मोठ्या खेळीत करेन, असे जयस्वाल म्हणाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे