सोलापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।जमिनीतून गुप्त धनाचा हांडा काढून देतो’ असे सांगून 1 कोटी 87 लाख 31 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबास सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्नाटकातील विजापूर येथून पकडले. त्याच्याकडून जादूटोण्याचे साहित्य जप्त केले.सोलापुरातील रहिवासी गोविंद मल्लिकार्जुन चंगारी यांना राहत्या घरातून गुप्तधनाचा हंडा काढून देतो, असे आमिष मोहम्मद कादर शेख या भोंदूबाबाने दाखविले. त्यानंतर त्याने चंगारी यांच्यावर काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला. हंडा काढून देतो म्हणून त्यांच्याकडून वेळोवेळी 1 कोटी 87 लाख 31 हजार 300 रुपये घेतले. चंगारी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दि. 9 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांना भेटून अर्ज दिला. त्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्यात या भोंदूबाबा विरोधात जादूटोणा कायद्यासह फसवणूक तसेच इतर गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे सोपविण्यात आला. माने यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून शेख याच्या शोधासाठी चार पथके पाठविली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड