* मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेतर्फे आयोजित 'रेड रन मॅरेथॉन' स्पर्धेला उदंड प्रतिसाद
मुंबई, 12 ऑक्टोबर (हिं.स.) - आजची निरोगी आणि सक्षम युवा पिढी हे देशाचे भविष्य आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तरुणाई तसेच नागरिकांमध्ये एचआयव्ही / एड्स आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत रेड रन मॅरेथॉन २०२५ चे आयोजन आज (१२ ऑक्टोबर) करण्यात आले होते. यंदाच्या वर्षाची संकल्पना रन टू एण्ड एड्स (‘Run To End AIDS’) ही होती. समाजात एचआयव्ही / एड्स आजाराबाबतची जनजागृती करून आजाराचे समूळ उच्चाटन करूया, असे आवाहन उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) तथा मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक श्री. शरद उघडे यांनी केले. उपआयुक्त श्री. उघडे यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या स्पर्धेची सुरुवात झाली.
मुंबईतील युवकांमध्ये एचआयव्ही / एड्सबाबत जनजागृती करणे तसेच एचआयव्ही विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये मुक्त संवाद, शिक्षण आणि समर्थन या भावनेला प्रोत्साहित करणे, हे जनजागृती कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. रेड रन ही केवळ स्पर्धा नसून, ती एक चळवळ आहे. रेड रन या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून स्वत:चे व इतरांचे एचआयव्ही / एड्स पासून बचाव करण्याकरिता हे एक अद्वितीय व्यासपीठ तयार करण्यात आले आहे, असेही उपआयुक्त श्री. उघडे यांनी सांगितले.
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत महाविद्यालयीन युवकांकरिता एकूण चार किलोमीटर अंतराची व नागरिकांसाठी एकूण दोन किलोमीटर अंतराची रेड रन मॅरेथॉन २०२५ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये ५५० पेक्षा अधिक युवक/युवतींनी आणि २०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. तसेच २०० हून अधिक मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मॅरेथॉन मार्गावर कार्यरत होते.
उपआयुक्त श्री. उघडे यांनी सांगितले की, एचआयव्ही / एड्सशी मुकाबला करण्यासाठी एचआयव्हीबाबत ज्ञान आणि जागरूकता असणे हीच गुरुकिल्ली आहे. तसेच मुंबईतील तरुणांनी आरोग्यदूत म्हणून योगदान द्यावे. आरोग्यदूत यांच्या मदतीने आपल्या महाविद्यालयांमध्ये सहयोगी युवकांना एचआयव्ही / एड्स आजाराबाबत जागरूक करावे, असे आवाहन श्री. उघडे यांनी केले. आपण सर्व एकत्र येऊन एचआयव्ही / एड्स बाबत गैरसमज दूर करून, भेदभाव मिटवून, एक नवे सुदृढ भविष्य निर्माण करू शकतो. मुंबई ही संधीची, स्वप्नांची आणि धडपड करणार्यांची नगरी आहे. तरुणाईच्या स्वप्नांना दिशा देणारे, ऊर्जावान नेतृत्व हे तरुणाईच्या योगदानातून उभे राहू शकते. आजच्या युगात माहिती आणि जागरूकता हीच खरी शक्ती आहे. तुमच्याकडे योग्य माहिती असेल, तर तरुण जागरूक होतील आणि निर्णयसुद्धा योग्य होतील, असेही श्री. उघडे यांनी सांगितले.
या स्पर्धेत विजेत्या युवक व युवतींचा विशेष सन्मान उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) तथा प्रकल्प संचालक श्री. शरद उघडे यांच्या हस्ते करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व रोख रक्कम वितरीत करण्यात आली. यामध्ये युवतींमध्ये प्रथम पारितोषिक कुमारी रिंकी सिंग, आर. जे. महाविद्यालय, घाटकोपर; द्वितीय पारितोषिक कुमारी कौशल्या परमार, सोमय्या महाविद्यालय, विद्याविहार; तसेच युवकांमध्ये प्रथम पारितोषिक कुमार सुनिल सहानी, सेंट जि. जि. महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ आणि द्वितीय पारितोषिक विशाल यादव, शैलेंद्र महाविद्यालय, दहिसर यांनी पटकावले.
सदर स्पर्धकांना मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेतर्फे नॅको, नवी दिल्ली यांचेमार्फत राष्ट्रीय पातळीवरील रेड रन दिमापूर, नागालँड या ठिकाणी ऑक्टोबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेकरिता सहभागी होण्याची संधी मिळेल.
या कार्यक्रमाला डॉ. विजयकुमार करंजकर तसेच मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी