पुणे, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। बांधकाम प्रकल्पांमधून होणाऱ्या धुलीकणांच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे.महापालिकेच्या नव्या निर्णयानुसार, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), पाषाण येथे सेन्सर उपकरणांची वैज्ञानिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, सेन्सर तपासणी पूर्ण न झाल्यास कोणत्याही बांधकाम प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्देशानुसार, बांधकाम स्थळांवरील वायू गुणवत्ता तपासणीसाठी सेन्सर-आधारित मॉनिटरिंग प्रणाली उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2023 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 च्या कलम 5 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभाग, बांधकाम परवाना विभाग आणि डब्ल्यू.आर.आय. इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीत या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु