सोलापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 21 व्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषक बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजला मिळाले. तर तिसरे पारितोषिक पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पटकावले.सांगोला येथील सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा 21 वा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवारी पारितोषिक वितरण झाले. समारोप समारंभास ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा.लक्ष्मीकांत दामा, सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव उदयबापू घोंगडे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, व्यवस्थापन परिषदेचे सचिन गायकवाड, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. वीरभद्र दंडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, महोत्सव समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. ललित विभागाचे विजेतेपद संगमेश्वर कॉलेजने पटकावले. वांग्मय विभागाचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभाग आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरला मिळाले. नाट्य विभागाचे विजेतेपद संगमेश्वर महाविद्यालयाने प्राप्त केले. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी कॉलेजला मिळाले. लोककला विभागाचे विजेतेपद शिवाजी महाविद्यालय बार्शी यांना देण्यात आले. नृत्य विभागाचे विजेतेपद एन. बी. नवले सिंहगड कॉलेज केगाव आणि सांगोला महाविद्यालय सांगोला यांना विभागून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड