सोलापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।रोटरी इंडियाच्या वतीने देशभरातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (सीएसआर) उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड २०२५ जाहीर करण्यात आले. या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये बालाजी अमाईन्स लिमिटेडने पश्चिम विभागातील मोठ्या उद्योगसमूह या गटात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वोत्तम सीएसआर कार्याचा पुरस्कार पटकावला आहे.हा पुरस्कार कंपनीचे महाव्यवस्थापक (वित्त) अरुण मासाळ यांनी स्वीकारला.बालाजी अमाईन्स लिमिटेड ही सोलापूरातील अलिफॅटिक अमाईन्स आणि स्पेशालिटी केमिकल्स निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, व्यावसायिक यशासोबतच कंपनीने सामाजिक जबाबदारीच्या क्षेत्रात विशेषत: आरोग्य सेवेच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. कोविड काळापासून कंपनी सातत्याने आरोग्यसेवेच्या बळकटीसाठी काम करत असून, सोलापूर शहरात तीन रुग्णालयांचे नूतनीकरण केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विनामूल्य किंवा अत्यल्प किंमतीत सेवा या रुग्णालयांच्या माध्यमातून गरजुंना मिळत आहे. या रुग्णालयांमध्ये आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्या कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीस तोड आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड