अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)
रविवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले बडनेरा रेल्वे स्थानकावरून जळगाव कडे निघालेल्या सराफा व्यापाऱ्याच्या बॅगेतील तब्बल २ किलो ३०० ग्रॅम सोने अज्ञात व्यक्तीने चोरून नेले.
सराफा व्यापारी किशोर वर्मा हे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी जळगाव वरून अमरावतीमध्ये व्यापाऱ्यांना दागिने दाखवण्यासाठी आले होते. दिवसभर व्यापार्यांना दागिने दाखवून आणि ऑर्डर घेऊन सायंकाळी ते हावडा-मुंबई मेलने जळगावला परत जाण्यासाठी बडनेरा स्थानकावर पोहोचले.
ट्रेनमध्ये चढताच त्यांची दागिन्यांनी भरलेली बॅग अचानक गायब झालेली त्यांच्या लक्षात आले . बॅगमध्ये २.३० किलो सोने होते. घटनेची माहिती वर्मा यांनी तात्काळ दिली त्यानंतर रेल्वे पोलीस स्टेशन, बडनेरा येथे तक्रार दाखल केली.रेल्वे पोलीसांनी स्थानकाच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप चोरट्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
या धाडसी चोरीमुळे अमरावतीतील सराफा व्यवसायामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी