अतिवृष्टीग्रस्त 5.४८ लाख हेक्टरला पॅकेजमध्ये ठेंगा
अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात अतिपावसाने शेतात पाणी साचून ४.९१ लाख शेतकऱ्यांची ५.४८ लाख हेक्टरमधील पिके बाधित झाली. यासाठी प्रचलित निकषाने ५७० कोटींची शासन मदत आवश्यक आहे. प्रत्यक्षात जाहीर विशेष मदतीच्या पॅकेजमध्ये या क्षेत्राचा
अतिपावसाने बाधित ५.४८ लाख हेक्टरला पॅकेजमध्ये ठेंगा ४.९१ लाख शेतकऱ्यांना ५७० कोटी आवश्यक; पॅकेजमध्ये उल्लेख नाही


अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।

सप्टेंबर महिन्यात अतिपावसाने शेतात पाणी साचून ४.९१ लाख शेतकऱ्यांची ५.४८ लाख हेक्टरमधील पिके बाधित झाली. यासाठी प्रचलित निकषाने ५७० कोटींची शासन मदत आवश्यक आहे. प्रत्यक्षात जाहीर विशेष मदतीच्या पॅकेजमध्ये या क्षेत्राचा उल्लेखही नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीऐवजी केवळ सवलती दिल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप सप्टेंबरपर्यंत सुरू होती. यादरम्यान अनेकदा अतिवृष्टी झाल्याने शेताचे तलाव झाले. त्यामुळे पिके पिवळी पडल्याने जाग्यावरच करपली. यामध्ये जी पिके वाचली, त्यांच्यावर बुरशीजन्य 'मर' रोगाचा अटॅक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत २६ सप्टेंबरला जिल्हा परिषदेत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी उपस्थित आमदारांनी याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सरसकट पिकांच्या पंचनाम्याचे आदेश कृषी व महसूल विभागाला दिले होते.याबाबतचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल विशेष बाब म्हणून ९ ऑक्टोबरला शासनाला सादर झाला. प्रत्यक्षात १० ऑक्टोबरला जाहीर शासनादेशात क्षेत्र डावलण्यात आल्याचे वास्तव आहे.

जिरायती पिकांचे सर्वाधिक नुकसान

सप्टेंबर महिन्यात अतिपावसाने १,५८,५४५ हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे, ८१,२०१ हेक्टरवरील तूर पिकाचे, १,८४,३७१ हेक्टरवरील कपाशी पिकाचे, २६६ हेक्टर मूग, २७६० हेक्टर ज्वारी, ११ हेक्टर उडीद, ४,७७९ हेक्टर धान, ३५,८०० हेक्टर मका व इतर ३६१२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय ७१ हजार हेक्टरमधील संत्रा, ३८१ हेक्टरमधील मोसंबी, ६६ हेक्टरमधील लिंबू पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande