बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्ह्यातील शहाजनपूर, शिरसमार्ग, तरटेवाडी, दिमाखवाडी, काळवाडी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना किराणा वाटप करण्यात आले. पूरग्रस्तांच्या अश्रूंना दिलासा देणारा आणि मानवतेचा अद्भुत संदेश देणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम बीड जिल्ह्यात राबविण्यात आला.श्री मुंबई जैन स्वयंसेवक मंडळ, गुलालवाडी (मुंबई) यांच्या सहकार्याने गुरु आनंद महिला प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने पूरग्रस्त शेतकरी बांधवांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
शहाजनपूर, शिरसमार्ग, तरटेवाडी, दिमाखवाडी आणि काळवाडी या पंचक्रोशीतील शेतकरी कुटुंबांना या मदतीचा लाभ मिळाला.पूरामुळे संकटात सापडलेल्या अनेक कुटुंबांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.वाटप करण्यात आलेल्या किराणा किट्समध्ये गहू, तांदूळ, साखर, गूळ, दाळ, रवा, तेल, चहा पत्ती आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.या सामाजिक उपक्रमात समीरभाई शहा, श्री. विशाल शहा आणि श्री. दीपकभाई डोशी यांनी पुढाकार घेत पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात दिला.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत म्हटले की, “मानवतेचे संवेदनशील दर्शन घडवणारा हा उपक्रम पूरग्रस्तांसाठी आशेचा किरण ठरला आहे.” मानवतेचा संगम, संवेदनांचा स्पर्श आणि समाजबंधाची जाणीव — हाच गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व जैन स्वयंसेवक मंडळ यांच्या कार्याचा खरा चेहरा ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis