अकोला : दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव!
अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्ग, गड यांचा सार्थ अभिमान अवघ्या भारतदेशाला आहे. दर दिवाळी सणामध्ये बच्चेकंपनी मातीचे किल्ले बनवून छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करत अ
अकोला : दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव!


अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्ग, गड यांचा सार्थ अभिमान अवघ्या भारतदेशाला आहे. दर दिवाळी सणामध्ये बच्चेकंपनी मातीचे किल्ले बनवून छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करत असते. याच दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र संसोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात 'अमृत'ने दुर्गोत्सवाचे आयोजन या दीपावलीमध्ये केले आहे. हा एक विश्वविक्रम करण्याचा संकल्प अमृतने केला आहे.

शिवछत्रपतींच्या पराक्रमांचे साक्षीदार असलेल्या १२ दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि साऱ्या महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरून आला. दर वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरोघरी बालदोस्त आणि तरुण, ज्येष्ठ मंडळीसुद्धा दुर्गांच्या प्रतिकृती साकारतात. नागरिकांनी आपल्या अंगणात, बाल्कनीमध्ये, हाऊसिंग सोसायटीच्या सार्वजनिक जागांमध्ये अगदी जमेल तिथे या १२ दुर्गांपैकी कोणतीही एक हुबेहूब प्रतिकृती बनवावी आणि आपल्या संकेतस्थळावर http://www.durgotsav.com त्यासोबतचे सेल्फी पाठवावेत.

दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या साऱ्यांच्या चित्रांचे संकलन केले जाईल. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनाच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने अभिनंदन पत्र पाठवण्यात येणार आहे. याशिवाय अमृतने निर्माण केलेल्या अमृत विद्या या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवरील शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास व त्यातून आज घ्यावयाचे धडे या विषयावरील 999/- रुपयांचे प्रशिक्षण, निशुल्क उपलब्ध करून दिले जाईल. यामध्ये स्वराज्यरक्षक दुर्ग, शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, कवी भूषण यांची कवने, स्वराज्यासाठी लढलेल्या स्वराज्ययोद्ध्यांच्या परिचयाची शृंखला या साऱ्या गोष्टींचा आस्वाद सहभागी होणाऱ्या साऱ्यांना मिळेल.

या बारा दुर्गां पैकी एक साकारा प्रतिकृती

रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग (सुवर्णदुर्ग).

गडदुर्ग हे १२ गडदुर्गापैकी कोणताही एक बनवावा

गडदुर्ग चा आकार कमीत कमी दोन फुट असावा जास्तीत जास्त कितीही असावा

सेल्फी मध्ये गडदुर्ग चा जास्तीत जास्त भाग दिसेल असा असावा

दुर्गोत्सव २०२५ या कार्यक्रमाचे अनावरण शिवश्रुष्टी हिस्टोरिकल थीम पार्क पुणे येथे अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजय जोशी यांचे हस्ते पार पडले. या कार्यक्रमात अमृत चे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीराम बेंडे, प्रवीण पांडे आणि सिद्धेश्वर वरणगावकर आणि राज्य व्यवस्थापक दीपक जोशी उपस्थित होते. या कार्यक्रम दरम्यान महाराष्ट्रात जास्तीत जास्त आबालवृद्धांनी गडदुर्ग बनवून, त्यासह सेल्फी काढून, दुर्गोत्सवाचे संकेतस्थळावर अपलोड करून, शिवरायांना अनोखी मानवंदना देऊया, या असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांनी केले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande