अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : यंदाच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रभरात हाहाकार माजवला आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, पिकांचे नुकसान झाले, पशुधन व संसार उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले स्वप्न आणि घामाचे कण क्षणात पाण्यात मिसळले. अशा संकटात सण-उत्सव साजरे करण्याऐवजी समाजाप्रती संवेदनशीलता दाखवणे हीच खरी संस्कृती आहे – आणि हाच आदर्श अकोल्यातील युवकांनी घालून दिला.
दरवर्षी भव्यदिव्य रावण दहन सोहळा आयोजित करणारे निलेश देव मित्र मंडळ आणि स्वराज्य मित्र मंडळ यांनी यावर्षीचा सोहळा रद्द करून बिर्ला राम मंदिरात प्रतिकात्मक रावण दहन केले. या प्रतीकात्मक कार्यक्रमाचा आयोजन गुरुवार, 2 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 7 वाजता करण्यात आला होता. या वेळी माजी गृहराज्यमंत्री व अकोला पालकमंत्री मा. डॉ. रणजीत पाटील, जयंतराव सरदेशपांडे, नरेश बियाणी, निलेश देव, अँड. गिरीश गोखले, अजय शास्त्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रावण दहनावेळी नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. तो पुतळा जळताना सर्वांना जाणवले – ही केवळ परंपरा नाही, तर समाजातील अहंकार, दुष्ट प्रवृत्ती आणि अन्याय नष्ट करण्याचा संकल्प आहे. कार्यक्रमानंतर मंदिरात ठेवलेल्या दानपेटीत नागरिकांनी मनापासून “फुल नाही, तर फुलांची पाळळी” अर्पण केली. या दानातून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी – पुरग्रस्त मदत या खात्यासाठी मा. जिल्हाधिकारी अकोला यांना आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी धनादेश स्वरूपात सुपूर्त करण्यात आली. या वेळी निलेश देव, अँड. गिरीश गोखले, अजय शास्त्री तसेच निलेश देव मित्र मंडळ कार्यकारीणीचे सदस्य उपस्थित होते. हा प्रसंग केवळ देणगीचा नव्हता; तो समाजातील संवेदनशीलतेचा आणि अकोल्याच्या हृदयातून उमटलेल्या करुण स्पंदनाचा होता. दरवर्षी निलेश देव आणि अँड. गिरीश गोखले यांच्या पुढाकारातून भव्य रावण उभारण्यात येतो. परंतु यंदा त्या खर्चाचा वापर समाजोपयोगी कार्यासाठी वळविण्यात आला.
“खरी दिवाळी तेव्हा, जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात दिवा लागेल” — हा भावनिक संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला. या उपक्रमाने अकोल्यात सामाजिक संवेदनशीलतेचे आणि जबाबदारीचे अनोखे उदाहरण निर्माण केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेल्या या योगदानाचे नागरिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन या सर्वांकडून कौतुक होत आहे. परंपरा जपली, पण खर्च समाजासाठी वळवला – ही भावना राज्यभरातील युवकांना प्रेरणादायी ठरत आहे. रावण दहन म्हणजे फक्त पुतळा जाळणे नव्हे; तो समाजातील अन्याय, अहंकार आणि असंवेदनशीलतेचा अंत करण्याचा संकल्प आहे. हा संकल्प बिर्ला राम मंदिराच्या अंगणातून आता संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे