अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी नविन मालिका सुरु करण्यात आली असून, इच्छूकांनी नियमित विहित शुल्क भरुन, तसेच खाजगी चारचाकी वाहनांकरीता विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरुन आकर्षक पसंती क्रमांक राखीव करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
> इच्छूकांनी दि. १४ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते दु. २.३० दरम्यान पसंतीचे क्रमांकाच्या विहित नमुन्यातील अर्जासह आधारपत्र, रहिवाशी पत्ता पुरावा, पॅनकार्ड या कागदपत्रांच्या साक्षंकित प्रती बंद लिफाफ्यात कार्यालयाच्या रोख विभागात जमा कराव्यात. लिफाफ्यावर वाहन मालकाचे नाव, वाहन वर्ग, पसंती क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक लिहिलेला असावा. एका क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता लावण्यात येईल.
या यादीमध्ये अर्जदाराचे नांव व पसंती क्रमांक असल्यास पसंती क्रमांक लिलावाचे शुल्क डीडी दिनांक १५ ऑक्टोबरला दुपारी २.३० वाजेपर्यंत रोख विभागात स्वीकारले जातील. अर्जासाठी त्याच दिवशी दु. ४ वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल. पसंती क्रमांकासाठी विहित सुधारित शुल्क लागू राहील.
त्यासाठी डीडी आर.टी.ओ. अकोला या नावे राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बँकेचा अकोला येथील असावा तसेच तो दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरिता आकर्षक / पसंती क्रमांकासाठी मुळ विहित शुल्काचा एक डी.डी. व लिलावासंदर्भात अर्जदाराच्या इच्छेनुसार जादा रकमेचा दुसरा डीडी हे आवश्यक राहतील.
लिलावाच्या डीडीचे फक्त एकच पाकीट ग्राह्य धरले जाईल. एकाच अर्जदाराने एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज टाकल्याचे आढळून आल्यास असा अर्ज रद्द समजण्यात येईल.
लिलाव प्रक्रियेत एखाद्या पसंती क्रमांकाला समान रक्कमेचे डीडी प्राप्त झाल्यास असा क्रमांक अर्जदारांच्या नावाच्या चिठ्ठया टाकून निश्चित करण्यात येईल. हा निर्णय सर्वांना लागू राहील,
पसंती क्रमांकाच्या आगाऊ नोंदणीकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोलाच्या कार्यक्षेत्रातीलच पत्ता असलेल्या वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत.
वाहन मालकास पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित शुल्क अदा करुन नोंदणी क्रमांक राखून ठेवता येतो. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाची वैधता ही 180 दिवस असून नोंदणी क्रमांक राखून ठेवल्याच्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास पसंती क्रमांकाची वैधता संपुष्टात येते. तदनंतर वैधता संपलेले पसंती क्रमांक पसंती क्रमांकाच्या पोर्टलवर उपलब्ध होऊन इतरांना ते राखीव करता येतील.
सदर लिलावानंतर लिलावात भाग घेतलेल्या अर्जदारांना त्यांचे पसंतीक्रमांक कार्यालयातून जारी झाल्यानंतर, नविन मालिकेतील उर्वरीत आकर्षक / पसंती क्रमांक जनतेला सिटीझन पोर्टलवर विहित शुल्क भरुन राखीव करता येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे