सामूहिक वनहक्क समिती सदस्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक प्रशिक्षण
चंद्रपूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली यांच्या माध्यमातून सामूहिक वन हक्क प्राप्त झालेल्या क्रियाशील समिती सदस्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 300 क्रिया
सामूहिक वनहक्क समिती सदस्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक प्रशिक्षण


चंद्रपूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।

बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली यांच्या माध्यमातून सामूहिक वन हक्क प्राप्त झालेल्या क्रियाशील समिती सदस्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 300 क्रियाशील सदस्यांना या प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे. या अनुषंगाने भद्रावती तालुक्यातील सामूहिक वन हक्क समिती सदस्यांसाठी वन अकादमीमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

प्रशिक्षणाची संकल्पना प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन व वन्यजीव) तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) एम. एस. रेड्डी यांच्या प्रेरणेतून साकारण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्राचे संचालक मनोज खैरनार यांनी सांगितले की, यावर्षी शासनाने महाराष्ट्र हरित अभियान अंतर्गत वनेत्तर जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीची जबाबदारी विविध विभागांना दिली आहे. सामूहिक वन हक्क समित्या या अभियानातील एक महत्त्वाच्या भागीदार ठरणार आहेत. तसेच नुकत्याच मुंबई येथे वनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सामूहिक वन हक्क समितीच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करून बायोथेनॉल निर्मितीची योजना प्रस्तावित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सर्व समिती सदस्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक प्रशिक्षण देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असून याच सदस्यांना पुढील काळात प्रत्यक्ष गावात जाऊन बांबूच्या मूल्यवर्धित उपयोगाबद्दलही प्रशिक्षण देण्याचे संस्थेचे नियोजन आहे. या प्रशिक्षणादरम्यान सदस्यांना बांबू लागवडीसाठी उपयुक्त प्रजाती, उपलब्ध शासकीय योजना, लागवडीचे प्रात्यक्षिक, बांबूचा मूल्यवर्धित उपयोग व संबंधित कायद्याची माहिती देण्यात आली. भद्रावती तालुक्यातील मुधोली, टेकाडी, वडाळा, मांगली, मासळ या गावांमधील 30 क्रियाशील समिती सदस्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

प्रशिक्षणाचे सत्रसंचालक वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार यांनी तर सहायक सत्रसंचालक म्हणून प्रवीण शिवणकर यांनी कार्य पार पाडले. याशिवाय तज्ञ मार्गदर्शक म्हणून जी. सी. मेश्राम (सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी), पर्यावरण विकास संस्थेचे शंकर भरडे, वनपाल विलास कोसनकर आणि मशीन निदेशक सुमित लिचडे यांनी विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande