चंद्रपूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'मन-महोत्सव 2025' हा जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. ‘आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता’ ही या वर्षाची मुख्य संकल्पना होती.
नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. अनिकेत भडके, डॉ. निवृत्ती जीवने, डॉ. अजय चंद्रीकापूरे, मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. संदीप भटकर उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी, हसा, आपल्या भावना व्यक्त करा व तणावमुक्त रहा, असा संदेश दिला. तर अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी दररोज सकारात्मक विचार करा आणि मानसिक आजारांविषयी बोला, असे आवाहन केले. या कार्यक्रमात मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य तज्ज्ञांनी उपस्थित नागरिकांना मानसिक आरोग्य, त्याचे महत्व, आणि आताच्या काळातील सामाजिक समस्या याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मानसिक आरोग्यावर आधारित ‘देवराई’ हा विशेष मराठी चित्रपटही दाखविण्यात आला आणि मानसिक आरोग्याविषयी संवाद साधण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव