नाशिक, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
अन्नाची गुणवत्ता सुनिश्चिती तसेच अन्नाचे उत्पादन, प्रकिया, वितरण व विक्री यांचे नियमन अन्न व मानके कायद्यान्वये करण्यात येते. शासनस्तरावर या कायद्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी जगजागृतीसह नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र व नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चअर्स असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने निमा हाऊस येथे आयोजित ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री झिरवाळ बोलत होते.
यावेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, अन्न व औषधे प्रशासन सहआयुक्त दिनेश तांबोळी, सहाय्यक आयुक्त मनिष सानप, विनोद धवड, अश्वमेध प्रयोगशाळेच्या डॉ. अपर्णा फरांदे, अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांच्यासह उद्योजक, अश्वमेध प्रयोगशाळा व के.के.वाघ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष मोहिम राबविली जात असून यात संशयास्पद माव्यापासून तयार करण्यात येणारी मिठाई व भेसळयुक्त दुग्धजन्य अन्नपदार्थाच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. दुग्धजन्य अन्नपदार्थांसोबतच इतर अन्न खरेदी करतांना नागरिकांनी सजगता बाळगणे महत्वाचे आहेत. नागरिकांना बहुतांश अन्न पदार्थ भेसळयुक्त आहेत किंवा कसे? ही तपासणी घरगुती स्तरावर करता येणे प्रत्येकास शक्य आहे. अन्न पदार्थातील भेसळ ओळखणे व अन्न व सुरक्षा मानके कायद्याचे महत्व यांची शहरासह व ग्रामीण भागात प्रबोधनपर कार्यक्रमातून प्रभावी जनजागृती होणे गरजेचे आहे. अन्न पदार्थ तपासणीचे अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी व होणारा विलंब टाळण्यासाठी विभागस्तरावर सहा व मुंबई शहरात दोन प्रयोगशाळा स्थापित होणार असून यास मान्यता प्राप्त झाली आहे. निमा तर्फे आयोजित जनजागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य असून नाशिकमध्ये अन्न उद्योग उभारणीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योगास चालना देण्यासाठी नाशिकमध्ये सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. यासोबतच नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत अन्न व औषध प्रशासनाचे नवीन कार्यालय सुरू करण्यासह नवनवीन उद्योग नाशिकमध्ये आणण्यास प्रशासनाचे पाठबळ मिळावे अशी अपेक्षा निमाचे अध्यक्ष श्री नहार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV