मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी महाविद्यालयाला सुट्टी, काँग्रेसची कायदेशीर कारवाईची मागणी
अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी चक्क महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आल्याचा आरोप
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीसाठी महाविद्यालयाला सुट्टी! काँग्रेसची कायदेशीर कारवाईची मागणी…


अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीसाठी चक्क महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. शिक्षण संस्थेच्या आवारात राजकीय कार्यक्रम घेणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे, हा नियमभंग असल्याचा दावा करत युवक काँग्रेसने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही बैठक पक्ष कार्यालयात न घेता, विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात घेण्यात आली. याच कारणामुळे आता ही बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय साबळे यांनी अशा प्रकारच्या राजकीय बैठकीच्या आयोजनावर टीका केली आहे. विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी ही एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आवारात थेट भाजपचा राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भाजपच्या शहर अध्यक्षांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत महाविद्यालयाला सुट्टी दिली आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे, असे साबळे म्हणाले. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी विद्यार्थ्यांना सुट्टी देत त्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यात आले. इतकेच नव्हे तर व्यवस्थापनाने संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा वापरही राजकीय कार्यक्रमासाठी केला. महाविद्यालयाच्या आवारातील हा कार्यक्रम पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हे ‘एआयसीटीई’ आणि ‘यूजीसी’च्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने अक्षय साबळे यांनी केली आहे.

--------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande