अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)
शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूरची ३७ वी आढावा बैठक साक्षी इन्फोटेक येथे मोठ्या उत्साहात पार पडली. ब्रॉडगेज डीपीआर चे कार्य मार्गी लागत असल्याने सत्याग्रहींमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून, शकुंतला झुकझुक गाडी लवकरच एक्सप्रेस होईल, या आशेने आंदोलनाचा पुढचा टप्पा ठरविण्यात आला.या बैठकीत २० ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला अचलपूर रेल्वे स्थानकावर प्रतीकात्मक व अहिंसक जनआंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ठरले.सत्याग्रहींमार्फत संध्याकाळी ४ वाजता रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान, नंतर नागरिकांना दिवाळी फराळ वाटप, चिमुकल्यांसोबत आतषबाजी, व ६ वाजता शेकडो दिव्यांनी उजळलेला दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.या बैठकीस योगेश खानजोड़े, डॉ. राजा धर्माधिकारी, दीपा तायडे, राजकुमार बर्डिया, राजेंद्र जयसवाल, कवि उज्ज्वल अग्रवाल, आकाश श्रीवास्तव यांच्यासह अनेक सत्याग्रही व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.आंदोलनाची ३७ वी टप्पा ही केवळ लढ्याची दिशा नसून, एक सामाजिक संदेश देणारा दीपोत्सव ठरणार आहे. सर्व अचलपूरकर नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी