रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) - आविष्कार या मतिमंद मुलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेने प्रतिवर्षिप्रमाणे खास दिवाळी निमित्त भेटवस्तूंनी भरलेला बॉक्स विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.
तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या दीपोत्सवात या मुलांच्या, त्यांच्या मेहनतीला आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सतत एक पाऊल पुढे राहण्याच्या जिद्दीला सतत जागृत ठेवण्यासाठी ग्राहकांनी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
आविष्कारच्या दिवाळी भेट बॉक्समध्ये पणती बॉक्स, मोबाइल पर्स, सेंटेड चाफा फुलांचा बॉक्स, बर्थ डे मेणबत्ती पॅकेट, एन्व्हलप सेट, मोदक शेप मेणबत्ती बॉक्स, उटणे वडी बॉक्स, स्टार आकाश कंदील, छोटे आकाश कंदील, एक उटणे पॅकेट अशा वस्तू आहेत. त्या साऱ्या वस्तू मतिमंद मुलांनी तयार केल्या आहेत. या परिपूर्ण गिफ्ट बॉक्सची किंमत ६०० रुपये आहे. ऑनलाइन खरेदीसाठी क्यूआर कोडही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी, बॉक्सच्या खरेदीसाठी संस्थेचे कार्यालय (02352) 295684 किंवा सचिन वायंगणकर (9422391182) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी