वॉशिंग्टन , 13 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल पुरस्कारापासून वंचित राहिल्यानंतरही निराश झालेले नाहीत. आतापर्यंत त्यांनी सात युद्ध थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. ज्यामध्ये भारत-पाकिस्तानमधील संघर्षही समाविष्ट आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की हे सर्व त्यांनी नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी केलेलं नाही. गाझा शांतता चर्चेसाठी मिसरला रवाना होत असताना ट्रम्प यांनी “एअर फोर्स वन”वर झालेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मिडल ईस्टच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी “एअर फोर्स वन” विमानात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी ट्रम्प यांना विचारण्यात आलं की, “इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता संपलं आहे का?” यावर ट्रम्प म्हणाले, “होय, नक्कीच युद्ध संपलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की सीजफायर (युद्धविराम) कायम राहील आणि मला वाटतं की ते टिकेलही.”या संवादादरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानसह आठ युद्ध थांबवल्याचा दावा केला.
ट्रम्प म्हणाले, “ही आठवी लढाई आहे जी मी संपवली. मला माहिती मिळाली आहे की पाकिस्तान आणि अफगानिस्तान यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. मी मिडल ईस्टहून परत आल्यावर तो संघर्षही मिटवेन.” ट्रम्प यांनी असंही म्हटलं की, “मला युद्ध थांबवण्यात कौशल्य आहे आणि मला आशा आहे की पाकिस्तान-अफगानिस्तान यांच्यातील वाद देखील लवकरच सुटेल.”
यावेळी संवादादरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांवर आर्थिक दबाव टाकून त्यांनी संघर्ष थांबवला. ट्रम्प म्हणाले, “मी भारत- पाक देशांना स्पष्ट सांगितलं की जर तुम्ही युद्ध करू इच्छिता आणि तुमच्याकडे अण्वस्त्र आहेत, तर मी तुमच्यावर १००, १५०, अगदी २०० टक्के टॅरिफ लावीन. त्यानंतर २४ तासांत सगळं ठिक झालं. जर टॅरिफ नसेल तर हे युद्ध कधीच थांबले नसते.” यापूर्वीही ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला होता.
ते पुढे म्हणाले, “आमचं ध्येय सगळ्यांना समाधानी ठेवणं आहे. मग ते ज्यू असोत, मुस्लीम असोत किंवा अरब देशांतील नागरिक असोत. इस्त्रायलनंतर आम्ही इजिप्तला (मिसरला) जाऊ आणि त्या शांतता करारात सामील असलेल्या प्रमुख देशांच्या नेत्यांशी चर्चा करू.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode