नाशिक, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
- सद्यःस्थितीत भारतामध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही देशाची मोठी हाणी असून, योग्य खबरदारीने अनेक घटना टाळता येणे शक्य आहे. देशात लिपिड विकारांशी संबंधित आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी लिपिड असोसिएशन ऑफ इंडिया (LAI) च्या तज्ज्ञ शिफारसींची अंमलबजावणी करावी, अशी मागणी हृदयविकार तज्ज्ञांनी केली.
लिपिड असोसिएशन ऑफ इंडिया (LAI) च्या महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे असोसिएशन ऑफ फिजिशियन्स, नाशिक यांच्या सहकार्याने पहिले राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते. दिल्ली, मुंबई, पुणे आणि नागपूर येथील तज्ञांसह ७० हून अधिक नामवंत डॉक्टरांनी या ऐतिहासिक एकदिवसीय कार्यक्रमात सहभाग घेतला.
या परिषदेमध्ये हृदयरोग, मूत्रपिंडविज्ञान, अंत:स्रावशास्त्र तसेच आहार, पोषण व जीवनशैलीविषयक भारत-संपर्कित मार्गदर्शक तत्त्वे अधोरेखित करण्यात आली. तसेच हृदयविकारामुळे देशात होणार्या मृत्यूच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. लिपिड विकारांशी संबंधित आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी LAIच्या तज्ज्ञ शिफारसींची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे यावेळी नमूद केले.
या परिषदेसाठी प्रमुख संयोजक डॉ. विनोद विजन, डॉ. विक्रांत विजन, डॉ. डी. चाफेकर आणि डॉ. सुजीत चंद्रत्रेय हे होते. यावेळी डॉ.विनोद विजन यांनी देखील सत्राच्या माध्यमातून आधुनिक उपचार पद्धतींबाबत उपस्थित डॉक्टरांना माहिती दिली. तसेच आपात्कालीन परीस्थितीतील रुग्णांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सीपीआर प्रशिक्षणाचे महत्त्व त्यांनी विशद केले. या अत्यंत केंद्रित आणि सहभागीपर परिषदेनंतर त्यांनी समाधानाची भावना व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV