सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई- बस सेवा’ योजनेतून सोलापूर महापालिकेला शहरासाठी १०० ईलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात ३० बस येणार आहेत. बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. वसंत विहार सबस्टेशन वरून ३३ केव्हीची लाईन त्याठिकाणी नेली जात असून त्याचे खोदकाम सुरू झाले आहे.
सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची सद्य:स्थिती खूपच बिकट आहे. कधीकाळी १०० हून अधिक बसगाड्या असलेल्या या उपक्रमाकडे सध्या १७ ते १८ बस आहेत. त्याही १२ ते १४ वर्षांच्या जुनाट आहेत. दुसरीकडे प्रवाशी वाढल्याने सोलापूर शहरात दरमहा सरासरी ५० ते ५५ रिक्षा वाढत आहेत. पण, आता सोलापूरकरांसाठी जानेवारीत ईलेक्ट्रिक बस येणार आहेत. त्यातून रिक्षाच्या तुलनेत निम्मेच तिकीट असणार आहे.
दरम्यान, वसंत विहार येथील महावितरणच्या सबस्टेशनवरून बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज चौक-हॉटेल ॲम्बेसेडर- प्रभाकर महाराज मंदिर- सम्राट चौकातून पुढे बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनपर्यंत जमिनीअंतर्गत लाईन नेली जात आहे. त्यासाठी खोदकाम सुरू असून एक महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. चार्जिग स्टेशनच्या कामासाठी अंदाजित साडेनऊ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड