कामकाजात सुसूत्रतेसाठी महावितरण कोल्हापूर परिमंडलात पुनर्रचना
कोल्हापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालय अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात येत आहे. या पुर्नरचनेची अंमलबजावणी कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात
कामकाजात सुसूत्रतेसाठी महावितरण कोल्हापूर परिमंडलात पुनर्रचना


कोल्हापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालय अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात येत आहे. या पुर्नरचनेची अंमलबजावणी कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात कालपासून (दि. १३) सुरुवात झाली आहे. दरम्यान, या पुनर्रचनेच्या अंमलबजावणीच्या कालावधीत वीजग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिले आहेत.

महावितरणच्या उपविभाग व शाखा कार्यालयांद्वारे सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची नियमित देखभाल, तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती, वीजबिलांची थकबाकी वसूली, वीजहानी कमी करणे, नवीन वीजजोडणी आदी कामे करण्यात येतात. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सरसकट कामांचा ताण कमी करून निवडक कामांची जबाबदारी देण्याकरता व्यवस्थापनाने पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले आहे. त्याचा वीज ग्राहकांना फायदा होणार आहे.

महावितरणच्या विभागीय कार्यालयांमध्ये कोणताही बदल न करता त्यात विभागीय देखभाल व दुरुस्ती पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या १० सदस्यीय पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. विभागातील सर्व उपकेंद्र व ३३ केव्ही वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम या पथकाकडे राहणार आहे. तसेच प्रत्येक शहरी विभागात सध्या अस्त्तित्वात सर्व उपविभागांचे महसूल व देयके तसेच देखभाल व दुरुस्ती अशी विभागणी करण्यात आली आहे. म्हणजे एका विभागात सध्या चार उपविभाग कार्यालय असल्यास पुनर्रचनेत देखभाल व दुरुस्ती तसेच महसूल व देयके असे प्रत्येकी दोन उपविभाग राहतील. देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरूस्तीचे कामे, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी अचूक बिलींग, बिलिंग तक्रारींचे निवारण, थकबाकी वसूली, नवीन वीजजोडणी ही कामे करणार आहेत. या पुर्नरचनेत ग्रामीण भागातील शाखा कार्यालयांच्या कार्यपद्धतीत मात्र अंशतः बदल करण्यात आला आहे.

या पुनर्रचनेमुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सरसकट एकाच वेळी अनेक प्रकारची कामे करण्याऐवजी आता अधिक केंद्रीत (फोकस) पद्धतीने निश्चित केलेली निवडक कामेच करावयाची आहेत. यामुळे कामांची जबाबदारी मर्यादित राहून कामाचा ताण देखील कमी होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. पर्यायाने वीजग्राहकांना मिळणारी ग्राहकसेवा आणखी दर्जेदार होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande