राष्ट्रसंतांच्या स्मृतीदिनी शेतकऱ्यांची वज्रमुठ
अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे आयोजित पालखी पदयात्रा शिबिरात ग्रामनाथांसाठी “आजच्या संघर्षातून उद्याच्या शेतीचे भविष्य” या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रसंतांच्या स्मृतीदिनी शेतकऱ्यांची वज्रमुठ  शेतकरी नेते मा. राजू शेट्टी, मा. अजित नवले आणि मा. बच्चू कडू यांची उपस्थिती


अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे आयोजित पालखी पदयात्रा शिबिरात ग्रामनाथांसाठी “आजच्या संघर्षातून उद्याच्या शेतीचे भविष्य” या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले.या सत्राला महाराष्ट्रातील प्रख्यात शेतकरी नेते राजू शेट्टी, अजित नवले व बच्चू कडू यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रभावी मांडणी केली.

महाराष्ट्रात यावर्षी ओल्या दुष्काळाचे संकट गंभीर बनले असून शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर मा. बच्चू कडू म्हणाले,“शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वाढता आकडा थांबवायचा असेल, तर कर्जवसुली तत्काळ थांबवून सर्वसमावेशक कर्जमाफी करावी आणि शेतमालाला हमीभाव द्यावा.”ते पुढे म्हणाले, “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे असे पहिले संत आहेत ज्यांनी आपला मुख्य ग्रंथ ‘ग्रामगीता’ थेट शेतकऱ्यांना अर्पण केला. त्यांच्या लेखणीतून प्रकट झालेला शेतकऱ्यांचा कळवळा आजही प्रेरणादायी आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकरी म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे, तरच हा संघर्ष यशस्वी ठरेल.”

अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सांगितले की,“शेतकरी हवालदिल झालेला असताना सरकारने कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सावरण्यावर भर द्यावा. आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आधाराची गरज आहे.”

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले मा. राजू शेट्टी म्हणाले,“वयाच्या पंचविशीत आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरू केला आणि आज साठी ओलांडूनही तो थांबलेला नाही. सरकारे बदलली, धोरणे बदलली, पण शेतकऱ्याची अवस्था मात्र बदलली नाही. म्हणूनच आता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःची ‘वज्रमुठ’ तयार ठेवली पाहिजे. जाती, धर्म, पंथ, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन एकत्र आल्याशिवाय शेतीचे प्रश्न सुटणार नाहीत.”

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहिलेल्या ओव्या उद्धृत करतगुरुकुलचे संचालक रवी मानव म्हणाले —

कष्ट करोनी महाल बांधिशी,परी झोपडीही नाही नेटकीशी, स्वातंत्र्या करिता उडी घेशी, मजा भोगती इतरची //

ऐशा भोळ्या शंकरासी, सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णतः तुझ्याशी, प्राप्त व्हावी मना वाटे//या ओव्यांमधून राष्ट्रसंतांनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या आहेत.हा विचार केवळ पुस्तकात न राहता कृतीत उतरावा, यासाठी सामूहिक प्रयत्नांची आणि संघर्षाची तयारी असली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.सभेच्या शेवटी सर्व शेतकरी नेत्यांनी 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात हजेरी लावणार असल्याची घोषणा केली आणि उपस्थित जनसमुदायालाही सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande