पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.)ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि सामूहिक मदत मिळावी यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही एक प्रभावी आपत्कालीन संपर्क प्रणाली सुरू करण्यात आली आहे. संकटकाळात एक व्यक्ती मदतीसाठी कॉल करताच त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना एकाच वेळी मोबाइलवर ऐकू जातो; ज्यामुळे तातडीने मदत मिळण्यास मोठी मदत होते.
अडचणीच्या वेळी तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने देशात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यातदेखील ही सेवा राबविण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशिव या सात जिल्ह्यांतील 438 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही सेवा सुरू आहे.
पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यातील ग्रामीण भागातील 30 पोलिस ठाणेअंतर्गत असणाऱ्या गावात ही सेवा सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते. ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभागी कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो. संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात मिळतो. दुर्घटनेचे स्वरूप, तीवता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबद्ध पद्धतीने मदत करता येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु