विशाखापट्टणम, 13 ऑक्टोबर (हिं.स.)यजमान भारताचा महिला संघाला एकदिवसीय विश्वचषकात सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर भारतीय महिला संघाचा गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून ३ विकेट्सने पराभव झाला. विशाखापट्टणम येथे भारताने ३३० धावा केल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत ७ विकेट्स गमावून भारताने ठेवलेलं लक्ष्य पार केले.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने १४२ धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला. एलिस पेरीने नाबाद ४७ धावा करत आपल्या संघाचा विजय निश्चित केला. गोलंदाजीत अॅनाबेल सदरलँडने फक्त ४० धावांत ५ विकेट्स घेतल्या. भारताकडून स्मृती मानधनाने ८० आणि प्रतीका रावलने ७५ धावा केल्या. श्री चरणीने ३ विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महिला एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक लक्ष्य ऑस्ट्रेलियाने गाठले. या संघाने २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेचा ३०५ धावांचा विक्रम मोडित काढला. भारताविरुद्ध कोणत्याही संघाने केलेला हा सर्वाधिक धावांचा पाठलाग होता.
भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियन महिला संघ विश्वचषकातील गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला. या संघाचे ४ सामन्यांत ७ गुण आहेत, ज्यामध्ये ३ विजय आणि एक अनिर्णित आहे. इंग्लंड ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी ४ गुण आहेतय पण यजमान संघ चांगल्या धावगतीमुळे तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाला शेवटच्या २ षटकात १३ धावांची आवश्यकता होती. स्नेह राणा ४९ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आली. तिने पहिल्या ५ चेंडूत ७ धावा दिल्या. एलिस पेरी पुढे सरकली आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारल. आणि ऑस्ट्रेलियन संघाला ३ विकेट्सने विजय मिळाला. पेरीने ५२ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या.
एलिस पेरी १६ धावा करून निवृत्त झाली होती. ६ विकेट पडल्यानंतर ती फलंदाजी करण्यासाठी मैदानावर परतली. तिने तळाच्या फळीतील फलंदाजांसह डावाची सूत्रे सांभाळली आणि ६ चेंडू शिल्लक असताना आपल्या संघाला विजय साकारुन दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे