- उत्तीर्ण उमेदवारांच्या 15 ऑक्टोबरला होणार मुलाखती
जालना ,3 ऑक्टोबर (हिं.स.)।
जालना जिल्ह्यातील जालना/बदनापूर उपविभागातील एकूण 185 पोलीस पाटील पदांसाठी घेण्यात आलेली लेखी परीक्षा दि. 12 ऑक्टोबर रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. या लेखी परिक्षेचा निकाल दि. 14 ऑक्टोबर रोजी jalnapp.recruitonline.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुलाखतीचे सविस्तर वेळापत्रक, उमेदवारानुसार वेळ आणि स्थळ लवकरच अधिकृत संकेतस्थळ recruitonline.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या मुलाखतीसाठी उमेदवारांना अत्यंत महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी खालील नमूद सर्वमूळ कागदपत्रे आणि त्यांच्या दोन (2) साक्षांकित (Attested) प्रती तसेच नजीकच्या काळातील दोन (2) पासपोर्ट आकाराचे फोटोसोबत घेवून वेळेवर मुलाखतीस उपस्थित राहावे. तसेच 10 वी, (आवश्यक) 12 वी (असल्यास) आणि पदवी परीक्षा (असल्यास) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्रक, तहसीलदार यांनी निर्गमित केलेले वय व अधिवास प्रमाणपत्र (Age and Domicile Certificate), जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) व जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) (असल्याtस), नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate) (लागू असलेल्या मागास प्रवर्गास), लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (Affidavit of Small Family), आधार कार्ड / मतदार ओळखपत्र (Aadhaar Card / Voter ID), उमेदवाराचे परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket), नमूना ‘फ’चे प्रमाणपत्र (लग्नानंतर नावात बदल असल्यास), जाहिरातीत नमूद केलेले इतर सर्व आवश्यक मूळ कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे. वरीलप्रमाणे नमूद आवश्यक मूळ कागदपत्रापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर न केल्यास, उमेदवारास मुलाखतीसाठी तात्काळ अपात्र ठरविण्यात येईल. उमेदवारांची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
उमेदवारांनी वेळोवेळी recruitonline.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घ्यावी. कोणतेही वैयक्तिक पत्र अथवा लेखी पत्र व्यवहार उमेदवारांना केला जाणार नाही. मुलाखत प्रक्रिया हीअतिशय पारदर्शक आणि पूर्णपणे निष्पक्षपद्धतीने घेतली जाणार आहे. यामुळे उमेदवारांनी कोणत्याहीअफवांवर विश्वास ठेवू नये. निवड प्रक्रियेत कोणीही शिफारस, हस्तक्षेप किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही एजंट, दलाल किंवा मध्यस्थांना संपर्क करू नये. असे कृत्य करतांना कोणीही व्यक्ती (उमेदवार अथवा दलाल) निदर्शनास आल्यास, संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल व संबंधीताची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस पोलीस पाटील निवड समिती कोणत्याही परिस्थितीत निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होवून देणार नाही याची सर्व संबंधीत उमेदवरांनी नोंद घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जालना यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis